सोलापूर : पावसाळ्याचे दिवस होते, सगळीकडे फक्त हिरवळच हिरवळ होती. लोकं आंनदी होती. दिवसभर थकून भागून घरी आल्यानंतर लोक दोन घास खाऊन अंगणात गप्पा मारत बसत असत. असेच दिवसामागून दिवस जात होते आणि तो एक दिवस उजाडला, ज्याची कल्पना कुणी स्वप्नातही केली नसेल. ही एका दुर्दैवी ठरलेल्या गावाची गोष्ट आहे.
पहाटे सर्वजण साखरझोपेत होते, पावसाच्या सरींचा तरी आवाज येईल असं वाटलं होतं, पण ज्याची किंचितही कल्पना केली नव्हती असा झोप उडवणारा, अंगाचा उरात थरकाप उडवणारा आवाज कानावर धडकला अन् सर्वजण धाडकन् झोपेतून जागे झाले. हा आवाज होता जमीन फाटल्याचा, भूकंप झाल्याचा. हे गाव होतं अर्जुनसोंड, सोलापूरचं. 1993 साली झालेल्या त्या भयंकर भूकंपाला यंदा 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्याच्या अजूनही आठवणी तशाच भळभळत्या आहेत.
30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरच्या किल्लारी गावात झालेल्या या भूकंपानं संपूर्ण देश सुन्न झाला होता. तब्बल 11 जिल्ह्यांना या भूकंपाचा फटका बसला होता. सोलापूर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनसोंड गावातील घरंच्या घरं जमीनदोस्त झाली होती. लोक जिवाच्या आकांतानं किंचाळत होते, जीव मुठीत धरून वाट मिळेल त्या दिशेनं पळत होते पण शेवटी जमिनीनं त्यांच्या घरांना आपल्या उदरात सामावून घेतलंच. भूकंपापासून गावकरी सुरक्षित राहावे यासाठी अख्खं गाव स्थलांतरित करण्यात आलं.
या घटनेला 31 वर्षे झाले तरी गावकरी आपल्या जुन्या गावी परतण्यास तयार नाहीत. त्या भूकंपाचे हादरे आजही त्यांच्या मनात तसेच जिवंत आहेत. गावातील लोकांनी सांगितलं, ‘संपूर्ण अर्जुनसोंड साखरझोपेत असताना भूकंपाचे हादरे जाणवायला लागले. घराच्या भितींवर एखादा मोठा ट्रक येऊन धडकला की काय एवढा भयानक आवाज झाला. मातीची घरं पूर्ण ढासळली, त्यात गावकरी जखमी झाले, कसेबसे अंगणात आले. त्यानंतर या गावातील लोकांचं स्थलांतर गायरानावर करण्यात आलं होतं. अशा या भूकंपाने सर्वच हादरून गेले होते. त्या आठवणी काळ पुढे लोटला गेला तरी आहे तशाच आहेत.