योगेश मारणे
न्हावरे : तिरुअनंतपुरम (केरळ) येथे नुकत्याच पार पडलेल्या साऊथ झोन-२, सी.बी.एस.ई शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये १० मी.पिप साईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील पोद्दार स्कूलची ओवी निलेश पवार या विद्यार्थिनीने ४०० पैकी ३९० गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळविले आहे.
त्यामुळे ओवीची भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या सी.बी.एस.ई नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व तामिळनाडू अशा ६ राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. पुढील स्पर्धेसाठी निवड झालेली ओवी ही शिरूर तालुक्यातील पहिलीच नेमबाज बनली आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ओवी ही शिरूरमधील युनिक शूटिंग क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ओवीच्या यशाबद्दल पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिंसिपल निरज राय व शिक्षक वृंद यांनी पुढील स्पर्धेसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.