छत्रपती संभाजीनगर: घर, प्लॉट खरेदी- विक्रीचे प्रलंबित फेर करुन देण्यासाठी व यापूर्वी करुन दिलेल्या १२० फेरसाठी प्रत्येकी १ हजार प्रमाणे १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर त्यातील ९० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सातारा सजाच्या तलाठी आणि त्याच्या सहकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.२७) दुपारी बीड बायपास रोडवरील तलाठी कार्यालयात करण्यात आली. दिलीप रामकृष्ण जाधव (५५) लाचखोर तलाठ्याचे, तर रवी मदन चव्हाण (३१, रा. सातरा तांडा) असे त्याला मदत करणाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे ज्योती बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
कंपनीच्या प्लॉट, घर खरेदी विक्रीचे प्रलंबीत फेर नोंद व यापूर्वी केलेले १२० फेरचे, प्रतिफेर १ हजार रुपये प्रमाणे एकूण १ लाख २० हजार रुपये लाचेची मागणी तलाठ्याकडील खाजगी व्यक्ती रवी चव्हाण याच्याकडून करण्यात आली होती. यापूर्वी तक्रारदार यांनी आरोपींना ३० हजार रुपये दिले होते. मात्र, उर्वरित पैशासाठी आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २५ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने पडताळणी करुन २७ सप्टेंबर रोजी सापळा रचला. ९० हजारांची लाचेची रक्कम तलाठी जाधव यांच्या सांगण्यावरुन खासगी व्यक्ती रवी चव्हाण याने स्वीकारताच पथकाने दोघांना पकडले.