पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुकीत ९ जागा जिंकत भाजपने मारली बाजी मारली आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
हि निवडणुक भाजपच्या वतीने विद्यापीठ विकास मंच विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले पॅनेल यांच्यात लढत झाली. तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा आदी पक्ष-संघटनांचे एकूण ३७ उमेदवार १० जागांसाठी रिंगणात होते. या निवडणुकीची मंगळवारी (ता.२२) रात्री उशीरा मतमोजणी संपली.
भारतीय जनता पक्षाशी संबंधितांच्या विद्यापीठ विकास मंचाने १० पैकी नऊ जागांवर विजय मिळवला. त्यात खुल्या गटात प्रसेनजित फडणवीस, सागर वैद्य, युवराज नरवडे, दादाभाऊ भिकाजी शिनलकर, अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे, भटक्या जाती प्रवर्गातून विजय सोनवणे, इतर मागास प्रवर्गातून सचिन गोरडे, अनुसूचित जमाती प्रवर्गातूनगणपत नांगरे, तर महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर यांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या बाकेराव बस्ते या एकमेव उमेदवाराने विजय मिळवला.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत वेगळी चूल मांडल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले. काँग्रेसने महाविकास आघाडीत सहभागी न होता छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिला होता.
मात्र या पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मतांच्या विभागणीचा महाविकास आघाडीला फटका बसला.