मुंबई : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने सद्या महायुतीमध्ये देखील जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये होत असलेल्या कोंडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आक्रमक पवित्रा घेण्यास सुरूवात केली असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार आग्रही दिसत आहेत. महायुतीमधील मुख्यमंत्रिपद तीनही घटक पक्षांना आलटून-पालटून दिले पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आता समोर आली आहे. पण पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांनी या मागणीचे खंडन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान अमित शहांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वंतत्र चर्चा केल्याचे देखील बोलले जात आहे.
अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद फिरते असले पाहिजे, अशी अट घातल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले तर प्रत्येक घटक पक्षाला आलटून पालटून मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, असे अशी मागणी अजित पवार यांनी अमित शहांकडे केली असल्याचे बोलले जात आहे.
परंतु, या बैठकीनंतर प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाबाबत अशा कोणत्याच मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘अमित शहांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्रिपदाचा मुद्दासुद्धा उपस्थित झाला नाही.’ असे प्रफुल पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यासोबतच, ‘महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असू एकमेकांमधील समन्वय वाढवण्यावरील चर्चेला या बैठकीमध्ये अधिक भर देण्यात आला होता.’ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.