पुणे : मान्सूनने परतीची वाट धरल्यानंतर राज्यात गेल्या ४ दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घेतला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून धरणे तुडुंब भरली आहे. दुसरीकडे शेतीपिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास कधी थांबणार? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. अशातच आता हवामान खात्याने पावसाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
आयएडीने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवारपासून राज्यात सुरु असलेल्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह, मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मध्यप्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. यामुळे दक्षिण गुजरातपासून वायव्य बिहारपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरु आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा..
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर जिल्ह्यांला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसाची शक्यता..
मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलं आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून उघडीप मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नैऋत्य मौसमी परतीचा पाऊस मंगळवारी पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून परतला. मात्र, त्यानंतर मान्सूनची वाटचाल थबकली असून फिरोजपूर, सिरसा, अजमेर, चुरू, दीसा, सुरेंद्रनगर, अजमेर ते जुनागडपर्यंत परतीची सीमा कायम आहे. या भागातून मान्सून परतला नसल्याने पुढील चार ते पाच दिवस आणखी काही राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.