मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघावर सलग तीस वर्षे वर्चस्व राखणारे माजी आमदार राजन पाटील यांना त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. पाटील यांची महाराष्ट्र सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शासन आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५४ (अ) (१) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या अध्यक्ष व सदस्य या पदावर केलेल्या नियुक्त्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सदर परिषदेची नव्याने पुनर्रचना तसेच, अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे सदर परिषदेची नव्याने पुनर्रचना करण्यासाठी माजी आमदार राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. कलम १५४ (अ) (४) मधील तरतूदीनुसार या परिषदेचा कार्यकाल २७ सप्टेंबर, २०२४ पासून तीन वर्षे अथवा पुढील आदेश होईपर्यंत, यापैकी जो कालावधी कमी असेल तोपर्यंत राहणार आहे.
कोण आहेत माजी आमदार राजन पाटील?
माजी आमदार राजन पाटील हे 1995 पासून 2004 पर्यंत मोहोळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधानसभेची पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवत विजय मिळवला होता. जेष्ठ नेते शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पाटील यांनी शरद पवारांना साथ देत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 1999 आणि 2004 या दोन्ही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवल्या आणि मोठ्या फरकाने जिंकल्या. मात्र, 2004 च्या पुनर्रचनेत मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्याने पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला.