पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला शिवाजीनगर पोलिसांनी नदीपात्रातील रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. अंबाजी कल्याणी शिंगे (वय २४, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. शिंगेविरुद्ध वानवडी, मुंढवा, हडपसर भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
शिवाजीनगर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. नदीपात्र परिसरातील नाना-नानी पार्कजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शिंगेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय पांढरे, कैलास दाबेराव, सचिन जाधव, दीपक चव्हाण, अतुल साठे यांनी ही कारवाई केली. शिंगे याने पिस्तूल कोठून आणले, तसेच त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.