शिरूर : रात्रीच्या सुमारास मेंढ्याच्या कळपात दोन बिबटे घुसल्याने मेंढ्या इकडे तिकडे धावू लागल्या. या बिबट्यांच्या हल्ल्यात चार मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. आमच्या भटक्या जीवनात दिवसभर चाऱ्यासाठी भटकायच आणि रात्री बिबट्याला सामोर जायच. नुकसान सहन करत कुटूंबाच संरक्षण करायच. अअसा काहीसा नाराजीच्या प्रतिक्रिया मेंढपाळांकडून व्यक्त केल्या जात आहे. टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील टेमकर वस्ती जवळ शेतात हा सर्व प्रकार घडला आहे.
टाकळी हाजी येथील टेमकर वस्ती जवळ शेतात तळ ठोकलेल्या धनगरांच्या शेळी मेंढ्यांच्या कळपावर दोन बिबट्यांनी हल्ला करून चार मेंढ्या जागीच ठार केल्या आहेत. दोन शेतात ओढून नेल्या. ही घटना सोमवारी (ता. 23) रात्री नऊच्या सुमारास घडली. पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील मेंढपाळ दत्ता बबन कोळेकर, मच्छिंद्र बबन कोळेकर, संतोष मोहन कोळेकर, बाळू पोपट कोळेकर हे आपल्या कुटुंबिया सह येथील शेतात तळ ठोकून होते. यामध्ये पाचशे शेळ्या मेंढ्यांचा कळप होता. हे मेंढपाळ टाकळी हाजी मार्गे मावळ भागाच्या दिशेने निघाली होते. दिवसभर परीसरात भटकंती केल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी टेमकर वस्ती जवळ रस्त्याच्या बाजूला शेतात त्यांनी तळ ठोकला होता.
सोमवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने मेंढ्या सैरभेर झाल्या होत्या. सगळीकडे अंधार जोराचा वारा आणि पाऊस सुरू होता. मेंढपाळ आणी कुटूंब घाबरली होती. त्यामुळे सगळीकडे धावा धाव झाली. याच काळात दोन-तीन बिबटे मेंढ्यांच्या कळपात घुसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या मेंढपाळांनी आरडा ओरड सुरू केला. यावेळी मेंढपाळासमोर दोन मेंढ्या घेऊन बिबट्यांनी पळ काढला. या मेंढपाळांना हा परिसर नवीन असल्याने बिबट्या बद्दल त्यांना काहीच माहीत नव्हते. स्थानिक रहिवासी नितीन थोरात यावेळी धावून आले. त्यांनी मेंढपाळांना धीर देऊन कळपासाठी स्वतःच्या घरासमोर उजेड करून निवारा उपलब्ध करून दिला. पण बिबट्याने चार मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर दोन मेंढ्या या कळपातून उचलून नेल्या आहेत.
या बाबत माहिती समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपाल गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम तातडीने दाखल झाले. त्यांनी मेंढ्यांना आणि मेंढपाळांच्या कुटुंबीयांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली. मेंढपाळांना बिबट्यापासून दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन केले. जयेश टेमकर, श्रेयश उचाळे, अविनाश सोनवणे, रोहित येवले, तुषार पवार यावेळी उपस्थित होते. वन विभाग कर्मचारी महेंद्र दाते यांनी या घटनेचा पंचनामा केला
रात्रीचा अंधार त्यात जोराचा पाऊस आणि वाऱ्यामुळे हे मेंढपाळ कुटूंब घाबरले होते. परीसराची माहिती नसल्याने मेंढ्याचा कळप व कुटूंबाचे संरक्षण करायचे कसे? असा प्रश्न या कुटूंबाला पडला होता. त्यातून बिबट्याने मेंढ्याच्या कळपावर हल्ला केल्याने हे मेंढपाळ कुटूंब घाबरले होते. स्थानिक रहिवासी नितीन थोरात आणि वन विभाग कर्मचारी मदतीला धावून आल्याने या बिकट प्रसंगी देवासारखे मदतीला धावून आल्याची भावना या मेंढपाळ कटूंबाने व्यक्त केली आहे.