भिगवण: शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी डाळज नं. ३ (ता. इंदापूर) येथील उपसरपंच विजय दत्तात्रय गलांडे यांचे सदस्यपद रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा निकाल दिला आहे. त्यामुळे डाळज नं. ३ येथील उपसरपंचांना शासकीय जागेत अतिक्रमण करणे चांगलेच महागात पडले आहे. डाळज नं. ३ येथील महादेव हनुमंत जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसरपंच विजय गलांडे यांच्याविरुद्ध शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबाबत तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती अतिक्रमण सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबद्दल विजय गलांडे यांचे सदस्यपद रद्द केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्या गाव कारभाऱ्यांना हा मोठा दणका मानला जात आहे. इंदापूर तालुक्यात यापूर्वीही काही ग्रामपंचायत कारभाऱ्यांना सरकारी जागेत अतिक्रमण केले म्हणून आपले पद गमवावे लागले होते.