योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका चौदा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शिक्रापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती बुधवारी (२५ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता टेलरिंगच्या कामासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पीडित लहान मुलगी घरात खेळत होती. घराला बाहेरून कडी लावून फिर्यादी कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्या होत्या. कपडे वाळत घालून खाली आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी घरात पाहिले असता, बेडवर अल्पवयीन आरोपी तीन वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करताना दिसला.
यावेळी मुलगी ओरडत असल्याने फिर्यादी यांनी आरोपीला पळत जाऊन ओढले. तो त्या ठिकाणाहून पळून गेला. त्यांनतर मुलीला उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 65/2 बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4,8,12, नुसार संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत.