पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. यानंतर एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नरेंद्र मोदी यांच्या या सभेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर सभेची जोरदार तयारीही सुरु आहे. मात्र काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे चिखल आणि दलदल झाली आहे. त्यातच कामगार टेंट उभा करणे आणि खुर्च्या लावण्याचे काम करत आहेत. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे. त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
जर आजही पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला तर पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या सभागृहात पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडू शकते. या सभागृहाची आसनक्षमता जास्त आहे. त्यामुळे वेळ पडल्यास याठिकाणी सभा घेतली जाण्याची शक्यता आहे.
पाऊस आणि हवामान तपासल्यानंतरच आयोजकांकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. तुर्तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एस पी कॉलेजच्या मैदानावर पार पडावी यासाठी मेहनत घेतली जात आहे. मात्र, आता पाऊस काय करणार, हे पाहावे लागेल. दरम्यान, पुणे शहर आणि उपनगरात सलग दोन दिवसांपासून वादळी वारे, मेघगर्जनेसह दमदार पाऊस होत आहे. अचानक होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.