शिक्रापूर (पुणे) : आपटी (ता. शिरूर) येथील माळवाडी येथे शेतात दोघांना धोकादायक पद्धतीने काम करण्यास सांगितल्याने संतोष केरबा मराठे या इसमाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी भाऊसाहेब सदाशिव ढगे व सचिन विश्वनाथ ढगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपटी येथील सचिन ढगे यांच्या शेतात भाऊसाहेब ढगे व सचिन ढगे यांनी संतोष मराठे व दिपक केदारी यांना शेतातील कामासाठी बोलावून घेत ट्रक्टरला धोकादायक पद्धतीने मोठे लाकडी ओंडके बांधले. दोघांनी सदर ओंडका ट्रॅक्टरच्या साहाय्याने ओढण्यास सांगितला. यावेळी ट्रॅक्टरने ओढत असताना ओंडका फिरल्याने दीपक केदारी यांच्या कमरेला लागून संतोष यांच्या डोक्यात लागला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच संतोष केरबा मराठे (वय ४३, रा. माळवाडी, आपटी ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. याबाबत अभय संतोष मराठे (वय २२, रा. माळवाडी, आपटी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.