-राहुलकुमार अवचट
यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या यवत गावातील नागरिकांचे महामार्ग प्रशासनाबद्दल अनेक समस्या आहेत. यातील एक समस्या म्हणजे भुयारी मार्ग जवळ असलेल्या बस थांबा परिसरातील साठणा-या पाण्यातून ग्रामस्थांची सुटका होणार कधी ? ही आहे. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समोर असणाऱ्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखालील मोरीत नेहमीच प्रचंड पाणी साठते. आज झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात याठिकाणी पाणी साठवून तळे तयार झाले आहे.
या परिसरातील शाळा सुटल्यानंतर लहान चिमुकल्या शाळकरी मुलांचा या तळ्यातील अतिशय दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवास सुरु असतो. त्यात रस्त्यावर मागून येणारी धोकादायक वाहने मुलाच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण करू शकतात. परंतु याबाबत पाटस टोल प्लाझाचे अधिकारी मूग गिळून गप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे. तात्पुरत्या स्वरूपात ड्रेनेज लाईनची साफसफाई वगळता गेल्या दहा वर्षात पूर्ण सफाई झाली नसल्याची माहिती मिळत आहे. ठेकेदार केवळ साफसफाई व डागडुजीच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले घेऊन मालामाल होत असल्याची चर्चा सध्या यवत परिसरात सुरु आहे.
पालखीच्या निमित्ताने मोरी लगत ड्रेनेज लाईनचे आरसीसी काम पूर्ण झाले, परंतु ते देखील ड्रेनेज लाईन सेवामार्गाच्या उंचीपेक्षा उंच असल्याने रस्त्यावर साठणारे पाणी या आरसीसी ड्रेनेज लाईन मध्ये जाणार कसे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक वर्षापासून पुणे सोलापूर महामार्गाच्या पुलाखालील मोरीत पाणी साठत असल्याचा प्रश्न प्रत्येक पावसाळ्यात उपस्थित होतो आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सेवा रस्त्यावर पाईपलाईनचे काम झाले असून यामुळे नागरिकांना अधिक समस्या निर्माण होत आहेत, याबरोबरच भुयारी मार्गातील दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. यवत काळभैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या ओढ्यातील कचरा अनेक वर्षापासून न काढल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असून काही वर्षांपूर्वी यामुळे आनंदग्राम सोसायटी मध्ये मोठा महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. यवत परिसरात सेवा रस्त्यावर अनेक समस्या असून टोल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. याबाबत किमान जनाची नाही तर मनाची लाज धरून यावर पाटस टोल प्लाझाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने भुयारी मार्गात पाणी साठलेले आहे. पुढील काही तासात पाणी ड्रेनेज द्वारे निघून जाईल तर भुयारी मार्गात लवकरच लाईट बसवण्याची व्यवस्था केली जाईल. पाईपलाईन कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे माहिती उपलब्ध होईल, असे पाटस टोल प्रशासनाचे सुरजित सिंग यांनी सांगितले.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी रोहन जगताप यांच्याशी संपर्क केला असता, याबाबत लवकरच उपयोजना केल्या जातील, असे सांगितले.