-सागर जगदाळे
भिगवण : पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. त्यात इंदापूर तालुक्यातील नावाजलेल्या तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात पावसाचे पाणी साचले आहे त्यामुळे पावसाचे पाणी थेट जिल्हा परिषद शाळेच्या वर्गांमध्ये शिरले आहे. त्यामुळे शाळा सुटताना विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
तक्रारवाडी जिल्हा परिषद ही पहिली ते सातवीपर्यंत असणारी नावाजलेली शाळा आहे. या शाळेमध्ये तक्रारवाडी सह भिगवण, मदनवाडी, खानोटा, कुंभारगाव व आसपासच्या खेडेगावातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, पण आज झालेल्या मुसळधार पावसामुळे आधीच जीर्ण झालेल्या इमारतीच्या वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली तर विद्यार्थ्यांनी या साचलेल्या पावसाच्या पाण्यात उड्या मारण्याचा आनंद घेतला.
जिल्हा परिषद शाळा ही खूप जुनी शाळा असल्यामुळे या शाळेचे बांधकाम कमकुवत झाले आहे. नवीन इमारत बांधण्याची गरज आहे. शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व शाळेत असणारी ही विद्यार्थी संख्या लक्षात घेता लवकरच मोठ्या वर्ग खोल्यांची इमारत असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करून शाळेला निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु अजूनही या कार्याला यश आले नसून भविष्यात एखादी दुर्घटना घडू नये, म्हणून लवकरात लवकर शाळेचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे.
डोंगर उतरून आलेले पाणी हे सरळ शाळेच्या पटांगणामध्ये साचत असते व या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती उपायोजना केली नसल्यामुळे शाळेच्या पटांगणात पाणी साचते. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा जोर जास्त असल्यामुळे पावसाचे पाणी थेट वर्ग खोल्यांमध्ये घुसल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसाची 63 मिलिमीटर पर्यंत नोंद झालेली होती.
आजी माजी आमदार यांनी निधी देण्यास तत्परता दाखवून या शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच बारामती तालुक्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेला गांभीर्याने घेऊन लवकरच शाळेसाठी निधी मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सांडपाण्याचे व सिमेंट रस्त्याचे अव्यवस्थित नियोजन…
तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची उंची ही शाळेच्या मैदानापेक्षा जास्त झाल्याने डोंगर उतारावरून आलेले पाणी हे थेट जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये साचत असून अतिरिक्त झालेले पाणी शाळेच्या व्हरांड्यात तसेच वर्ग खोल्यांमध्ये घुसत आहे. उंची वाढलेल्या रस्त्यामुळे खड्ड्यात गेलेले शाळेचे पटांगण व नियोजन शून्य असलेल्या गटर लाईन मुळे पाणी जाण्यास मार्ग नाही. शाळेच्या गेटमधून बाहेर पडणारे पाणी हे शाळेच्या मागील असणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये घुसत आहे. त्यामुळे तक्रारवाडी ग्रामपंचायतने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी तक्रारवाडी ग्रामस्थ करत आहे