मुंबई : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने कंबर कसून मैदानात उभा ठाकला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत महायुतीला धक्का दिला होता. आता महाविकास आघाडी मोठ्या तयारीसोबत विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू झाली आहेत.
महायुतीमध्ये तर या पदावरून जोरदार रस्सीखेच सूरू असल्याचे बघायला मिळत आहे. प्रत्येक घटक पक्ष त्याच्या नेत्याचा गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडावी म्हणून आग्रही दिसत आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी दोनदा हा विषय मांडला आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची विनंती केली. परंतु, इतर दोन पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. महाविकास आघडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्याबाबत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले..?
पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आम्ही अगोदरच 32 जागा निवडून येतील असा अंदाज बांधला होता. महाविकास आघाडीने 31 जागा जिंकून हा दावा खरा ठरवला आहे. आता विधानसभेला पण महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने जुन्या चुका टाळल्या. इंडिया आघाडीची स्थापना हे त्याचे द्योतक असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार?
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचाराला असता ते म्हणाले की, जो पक्ष सर्वात मोठा असतो, त्याचा मुख्यमंत्री होतो, ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे ते म्हणाले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना याच फॉर्म्युल्या आधारे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तेव्हा शिवसेना हा मोठा पक्ष होता. येथे विरोधक मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयीचा निर्णय काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी घेतील असे ते यावेळी बोलले.
एकत्रित लढणार निवडणूक
महाविकास आघाडीतील मतभेदावर त्यांनी आपलं मत व्यक्त केले, ते म्हणाले की तीनही पक्ष एकच अजेंडा, एकच रणनीतीवर काम करतील. त्याआधारे निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी त्यांनी बाजू मांडली. मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत विविध प्रदेशातील मुद्दे समोर करत त्यांनी काँग्रेसचा स्ट्राईक रेट कसा वाढला याची माहिती दिली.