बीड : बीड जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहताना एका 13 वर्षीय तरुणीची पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या चनई परिसरात घडली आहे. कल्याणी कानोबा गोचडे असे मृत मुलीचे नाव आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्याने नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तसेच तलाव विहिरी देखील काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे अनेकजण पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. असं असताना पोहताना अनेकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याने अख्खं गाव हळहळ व्यक्त करत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी ही सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला चांगलं पोहता येत असल्याने ती स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उतरली. मात्र, पोहताना तिला धाप लागल्याने ती पाण्यात गटकळ्या घेऊ लागली. यावेळी विहिरीच्या काठावर असलेल्या तिच्या भावासह चुलत्याने तिला पाण्यातून काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.
मात्र, कल्याणीला वाचवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर कल्याणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.