मुंबई : पितृपक्षात शक्यतो कोणत्याही गोष्टीचा आरंभ केला जात नाही, निर्णय घेतले जात नाहीत किंवा महत्त्वाची बोलणीही टाळली जातात. यंदा मात्र विधानसभा निवडणुका असल्याने या सगळ्यालाच बगल देऊन राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जे मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेते उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मंत्रालय परिसर तसेच राजकीय पक्षांची कार्यालये आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर झुंबड उडाली आहे.
पितृपक्षाला सुरुवात होऊन चार दिवस झाले. या पंधरवड्याबाबत अनेक आख्यायिका असून त्यानुसार या काळात पितरांचा वावर होत असल्याने कोणत्याही सकारात्मक गोष्टी शक्यतो टाळल्या जातात. नवी खरेदी, नवे निर्णय, शुभारंभ, मंगल कार्य बरेच जण करत नाहीत. यंदा मात्र विधानसभेच्या निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक पाहता या सगळ्या गोष्टींना बगल देण्यात आली आहे. अन्य वेळी या सर्व बाबी पाळणारे नेते आणि कार्यकर्तेही पितृपक्षातील सर्व समजुती झुगारून आपल्या राजकीय भवितव्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून मंत्रीपदासाठी बाशिंग बांधलेल्या शिवसेनेच्या संजय शिरसाट आणि भरत गोगावले या दोन विद्यमान आमदारांना दोन महत्त्वाची महामंडळे, तर मनीषा कायंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांना जिल्हा नियोजन समितीवर याच काळात नियुक्ती मिळाली आहे. सनदी अधिकारी मनोज सौनिक यांनीही महारेराच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार पितृपक्षातच स्वीकारला.