मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याने शेजारीच बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून थेट त्यांच्यावरच गोळीबार केला. ज्यानंतर सेल्फ डिफेन्समध्ये इतर पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. पण, आता या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅनरवॉर रंगलं आहे.
या पोस्टरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हातात पिस्तुल घेतलेले दिसत आहे. त्या पोस्टरवर ‘बदला पूरा’ असं लिहिलं आहे. या पोस्टरवर पक्षाचं किंवा कोणत्याही नेत्याचं नाव नसल्याने हे पोस्टर्स कोणी लावले असा सवाल उपस्थित केला जात आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत ठिकठिकाणी हे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत.
तसेच काही ठिकाणी “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” असा उल्लेख बॅनरवर असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही झळकतोय. एवढंच नव्हे तर या बॅनर्समधून मविआला देखील डिवचण्यात आलं असून ‘पोलिसांकडून वसूली करणार सरकार’ असाही उल्लेख काही बॅनर्सवर आहे. यामुळे आता नवा वाद सुरू पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
तर काही ठिकाणी महाविकास आघाडीवर निशाणा साधत भारतीय जनता पक्षाचे काही बॅनर लावले आहेत. ज्यानुसार, महाविकास आघाडीच्या काळात पोलीस सरकारसाठी वसुलीचं काम करीत होती आणि आता पोलीस जनतेची सुरक्षा करीत असल्याचं उल्लेख आहे. मुंबईतील अनेक भागात हे बॅनर्स सध्या झळकत आहेत.