पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. नाव जाहीर करताना पक्षाने सांगितले की, जगदीप धनखड़ हे एनडीए आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. ते पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.
यापूर्वी दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.
याच बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जगदीप धनखड़ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
एनडीएकडे पुरेसे संख्याबळ :
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उमेदवार जिंकण्यासाठी पुरेशी संख्या आहे. याशिवाय राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजपला काही बिगर-काँग्रेस विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळेल, जसे की बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस.
6 ऑगस्ट रोजी निवडणूक
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी जारी करण्यात आली आहे. यासाठी १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आयोगाने निवडणुकीसाठी ६ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.