लखनऊ: उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये भाजप नेत्याची पत्नी आणि दोन मुलांची आई तिच्या प्रियकरासह पळून गेली. महिला स्वत: भाजपच्या नेत्या असून त्यांनी सभापती पदाची निवडणूकही लढवली आहे. भाजप नेत्या ज्या व्यक्तीसोबत पळून गेल्या, तो यूपी पोलिसात कॉन्स्टेबल आहे. महिलेचा हा प्रियकर त्यांच्या घरात भाड्याने राहत होता. महिला 45 वर्षांची आहे, तर हवालदार तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान म्हणजेच 30 वर्षांचा आहे. महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे.
घरातून अडीच कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पत्नी हवालदारासह पळून गेल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे. पतीने कॉन्स्टेबलवर पत्नीला फसवल्याचा आरोप केला आहे. पतीने म्हटले आहे की, माझी पत्नी 45 वर्षांची आणि कॉन्स्टेबल 30 वर्षांचा आहे. दोघांमध्ये काही जुळत नाही. केवळ पैशाच्या हव्यासापोटी हा कॉन्स्टेबल पत्नीसह पळून गेला आहे. तो तिला मारूही शकतो.
हे प्रकरण गोपीगंज नगरचे आहे. येथे राहणाऱ्या भाजप नेत्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी गोंडा येथे राहणारा कॉन्स्टेबल विनय तिवारी उर्फ राज तिवारी हा त्यांच्या घरात भाड्याने राहायला आला होता. त्याचे पत्नीशी प्रेमसंबंध कधी सुरू झाले, याची त्यांना कल्पनाही नव्हती. कॉन्स्टेबलने अतिशय हुशारीने पत्नीला त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर तोंड उघडले, तर सर्वांना अडकवून टाकेल, असे सांगितले.
भाजप नेते म्हणाले, जेव्हा मला हे कळले, तेव्हा मी त्याला माझ्या घरातून हाकलून दिले. त्यांनी पत्नीलाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. कॉन्स्टेबलला घरातून हाकलून दिल्यानंतर त्याने आपल्याविरुद्ध मनात राग धरून कट रचण्यास सुरुवात केली. याच वैमनस्यातून 28 ऑगस्ट रोजी त्याने माझ्या पत्नीला फूस लावून पळवून नेले. त्यावेळी घरी कोणीच नव्हते. याचाच फायदा घेत पत्नीने घरातून बाहेर पडताना घरात ठेवलेले दोन कोटींचे दागिने आणि चार लाखांची रोकडही पळवून नेली. एवढेच नाही, तर तिने आपल्या सात वर्षाच्या मुलालाही सोबत नेले, असंही भाजप नेत्याने सांगितले.
फिर्यादींनी दोघांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. या संपूर्ण घटनेत काही स्थानिक लोकांचा हात असल्याचा आरोपही भाजप नेत्याने केला. यापूर्वी कॉन्स्टेबल विनय तिवारी भाड्याने राहत असताना अनेकवेळा घरात चुकीचे काम करताना पकडला गेला. त्याबाबत पोलिस ठाण्यातही ही माहिती देण्यात आली होती. पोलिस ठाण्याच्या मदतीनेच त्याला घराबाहेर काढण्यात आले.