मुंबई : देशभर आणि राज्यात ज्या प्रकरणाने संतापाची लाट निर्माण झाली होती, त्या बदलापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला होता, त्यानंतर आत्मसंरक्षणात्मक कारवाईत त्याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. अक्षय शिंदेच्या या एन्काऊंटरनंतर राज्यातून सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाच मागितला आहे. दरम्यान, अक्षय शिंदेवरील कारवाईनंतर 23 सप्टेंबरच्या रात्री खूप साऱ्या घडामोडी घडल्या आहेत.
कळवामधील रुग्णालयात मृतदेह..
काल संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मुंब्रा येथे अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठेवण्यात आला.
न्यायाधीश रात्री उशिरा आले..
काल संध्याकाळापासून अक्षय शिंदे याचा मृतदेह कळवा येथील रुग्णालयात ठेवण्यात आला होता. या घटनेचा पंचनामा करून अक्षय शिंदेचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात घेऊन जायचा होता. मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार न्यायाधीश उशिराने आल्यामुळे आले. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. त्यानंतर न्यायाधीश आल्यानंतर सकाळी साडे पाच वाजता मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिस अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवणार आहेत.
पोलीस आयुक्तांकडून जमखी पोलीस अधिकाऱ्याची विचारपूस..
मध्यरात्री नंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या जखमी पोलीस अधिकाऱ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत डुंबरे यांनी जखमी पोलीस अधिकाऱ्यांची योग्य ती काळजी घ्या अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत.
…अन्यथा आम्हालाही मारून टाका : अक्षय शिंदेचे कुटंबीय
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याचे कुटंबीय चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आम्हाला आमच्या मुलाला बघू द्या, अशी मागणी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांकडून करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. अक्षयचा मृतदेह जे. जे रुग्णालयात घेऊन जाणार आहेत, तेथे त्याचा मृतदेह पाहा, असे पोलिसांनी अक्षयच्या कुटुंबीयांना सांगितले. पोलिसांच्या या भूमिकेनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यानंतर नातेवाईक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक सुद्धा झाली. आम्हाला तोंड दाखवा नाहीतर आम्हाला पण मारून टाका असा आक्रोश आरोपीच्या आईने केला.