पुणे : शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे जुन्या तक्रारीचा राग आणि जमिनीमध्ये रस्ता मागण्यासाठी केलेल्या अर्जावरून एका तडीपार गुंडाने स्वतःच्या भावकीतील एका व्यक्तीला लाथा, बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी नामदेव कांतीलाल भोरडे (वय-४० वर्ष, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून बाळू दादाभाऊ भोरडे आणि दादाभाऊ भाऊसाहेब भोरडे (दोघेही रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नामदेव भोरडे हे २१ सप्टेंबर रोजी जमीन गट क्रं ८६८ मध्ये मेंढ्या चारत होते. त्यावेळी तेथे बाळु भोरडे हा हातात लोखंडी रॉड घेऊन आला. त्याने फिर्यादी यांना २०१७ मध्ये माझ्या वडिलांविरुद्ध कोर्टात टाकलेली केस काढुन घेण्याची धमकी दिली. तसेच जमीन गट नंबर ८६८ मध्ये रस्ता मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयात तु आणि तुझी आई व मामा यांनी जाऊन अर्ज का केला? तसेच मारुती पठारे यांची जमीन तु करायची नाही, अशी धमकी दिली.
त्यावेळी आरोपी बाळू हा त्याचे वडील दादाभाऊ भोरडे यांना फोनवर बोलत असताना त्याला सोडू नको, अशी धमकी दिली. त्यानंतर बाळू याने फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. एवढंच नाही तर मी तडीपार होतो. त्यामुळे जर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेला तर घरात घुसून हातपाय तोडीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, फिर्यादी नामदेव भोरडे यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात दोघा बाप-लेका विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच दोन्ही तडीपार आरोपी फरार झाले आहेत. तर फिर्यादी हे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल नलगे हे करत आहेत.
दोन्ही बाप-लेक गुन्हेगार प्रवृत्तीचे?
निमगाव म्हाळुंगी येथील बाळू दादाभाऊ भोरडे आणि दादाभाऊ भाऊसाहेब भोरडे या दोन्ही बाप-लेकांना त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे यापुर्वी पुणे जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले होते. परंतु तरीसुद्धा दिवसेंदिवस त्यांचा गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललेला आहे. त्यामुळे शिक्रापुर पोलिस या सराईत गुन्हेगारांना अटक करणार की त्यांना अटकपुर्व जामीनासाठी वेळ देणार याबाबत निमगाव म्हाळुंगीसह शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.