Badlapur Encounter : बदलापूर येथे शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. याचदरम्यान अक्षय शिंदे याला पोलीस ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्ववसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी मुख्य आरोपीवर गोळीबार केला आहे. अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. अक्षय शिंदेला चौकशीसाठी घेऊन जात असताना पोलिसांची बंदूक हिसकावून त्याने पोलिसांवर गोळी चालवली. नंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला. पुढे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या घटनेवर भाष्य करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर या प्रकरणातील सरकारचे वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात न्यायालयीन चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.