पिंपरी : भाजपने पिंपरी विधानसभेवर दावा केल्याने आता पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर दावा केला आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मासिक बैठक रविवारी आमदार अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली खराळवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीनही मतदार संघ येतात, त्यापैकी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील अधिकृत उमेदवार संघ आहे. तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढणार आहे. त्याव्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत, असा ठराव पक्षाच्या मासिक सभेमध्ये शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला. त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले.
यावेळी आमदार आण्णासाहेब बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लांडे, काटे, बहल अनुपस्थित
पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असताना भाजपने या मतदारसंघावर दावा केल्याने तातडीने खराळवाडीतील पक्ष कार्यालयात रविवारी बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल हे अनुपस्थित होते. यामुळे तीनही मतदारसंघावर खरंच राष्ट्रवादीने दावा केला आहे का? अशीही चर्चा होत आहे.