पुणे : राज्यातील काही भागात गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. आजपासून परतीचा पाऊस सुरु होणार आहे. अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज सोमवार पासून पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य माहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना फटका बसणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व नगर जिल्ह्यांत 5 मिमी, तर सांगली व सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातही दिवसभर पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी राज्यभराला पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे व नगर जिल्ह्यांत ताशी 10-13 किमी राहिल. दरम्यान, पुणे आणि नवी मुंबईतील काही भागात आज सोमवारी सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे.
वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी राज्यभराला पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.