मुंबई : देशाची अर्थव्यवस्था 2032 पर्यंत 10 लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील सहा वर्षांसाठी प्रत्येक 18 व्या महिन्यात एक ट्रिलियन डॉलर्सची वाढ होईल. आयडीबीआय कॅपिटलने शनिवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, 2030 पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल.
अहवालानुसार, देशाचा वेगवान विकास मुख्यत्वे उत्पादन क्षेत्राच्या बळावर होईल. हे क्षेत्र सकल मूल्यवर्धित (GVA) मध्ये 32 टक्के योगदान देऊ शकते. ‘मेक इन इंडिया’सारख्या प्रमुख उपक्रमांनी देशाची उत्पादन क्षमता वाढविण्यात आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची अपेक्षा आहे. त्यातच आयआयपीमध्ये भारत पहिल्या पाच देशांच्या पुढे असेल असा अंदाज आहे.
जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारत औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) अमेरिका, चीन, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांना मागे टाकून उत्पादन क्षेत्रात आघाडीच्या जागतिक अर्थव्यवस्थांना मागे टाकेल, असा अंदाज आहे.