केज : पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात गेलेली अल्पवयीन मुलगी ही साडे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार केज तालुक्यात उघडकीस आला आहे. सदर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा अन्य कोणी नसून तिच्या मामाचा मुलगाच आहे.
केज तालुक्यातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी तिची आई तिला केज येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून गेली होती. तिथे तिची सोनोग्राफी केल्यानंतर समजले की, ती अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे. त्या नंतर तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुन्हा तिची सोनोग्राफी केली असता ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा रिपोर्ट घेवून ती अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईसोबत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रसूती वॉडांतील भरती झाली. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मागील आठ महिन्यांपासून शेजारच्या गावातील तिच्या मामाच्या मुलाने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले.
त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात पीडितेच्या मामाच्या मुलाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार केल्याचा व बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.