पुणे : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
तसेच या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे, असंही मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे म्हणाले, एनएचएआयमार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरुर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामे करण्यात येतील. मुंबई- बेंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.