पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहेराहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी शारीरीक व मानसिक छळ केला. धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेच्या अन्नात विष कालवून जीवे मारण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. हा प्रकार २००९ पासून २० सप्टेबर २०२४ च्या कालावधीत सुरु होता. दरम्यान याच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने २० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली आहे.
गौरी मनोज गायकवाड ( वय-३६, रा. अहिल्या सोसायटी, आंबेडकर चौक, येरवडा ) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी उज्वला रमेश आडागळे ( वय-५३, रा. कमेला कोंढवा ) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती मनोज सुरेश गायकवाड (वय-३७), सासू मंदा सुरेश गायकवाड (वय-५६), नणंद रेखा कांबळे (वय-४५), दीर आकाश सुरेश गायकवाड (वय-२६, हे सर्व रा. अहिल्या सोसायटी, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी गौरी आहे. गौरी हिला तिचा पती, सासू, नंणद, दीर हे वेळोवेळी घरात थोड्या थोड्या गोष्टींवरून घालून पाडून बोलत असे. जेवणावरुन देखील काहीतरी तिच्या चुका तसेच कुरापती काढत. तू तुझ्या माहेरी निघून जा असे सांगुन तिचा शारीरीक आणि मानसिक छळ केला जात होता. माहेराहून पैसे तसेच सोन्याचे दागिने आणण्यास सांगून, गौरीला काही काम येत नाही, या कारणावरुन सतत तिला त्रास देत असत.
दरम्यान, तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करत असे. तिच्या अन्नात विष कालवून तिला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. याच सासरच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून गौरी हिने आत्महत्या केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.