जुन्नर : जुन्नर येथील न्यायालय परिसरात अचानक जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. चंद्रकांत किसन हांडे (वय ५४ रा.उंब्रज नंबर दोन ता. जुन्नर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयीन कामाकाजासाठी ते आपल्या बहिणींसोबत आलेले होते.
अधिक माहिती अशी की, न्यायालय परिसरात अचानक चंद्रकांत हांडे यांच्या अंगावर जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी पडली. यावेळी उपस्थित वकील व नागरिकांनी हांडे यांच्या अंगावरील झाडाची फांदी बाजूला केली. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कोकाटे यांनी दिली. मयत हांडे यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. जुन्नर पोलीसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ह्या झाडाच्या अनावश्यक फांद्या तोडण्यात याव्यात अशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे बोललं जात आहे. न्यायालयाच्या आवारातील घडलेल्या या घटनेने जुन्नर शहरातील जुन्या जीर्ण झाडांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत प्रशासनाने भविष्यात जीवित हानी टाळण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.