सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी सोलापूरच्या राजकारणात मोठी रंगत आणली आहे. काडादी यांच्यासाठी सध्या भारतीय जनता पक्षात असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते राजशेखर शिवदारे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसते.
काडादी यांच्या गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीला राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, राधाकृष्ण पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, महादेव चाकोते, सायबन्ना बिराजदार, शिवानंद पाटील कुडल, वसंत पाटील भंडारकवठे, अख्तरताज पाटील, राम वाकसे, सिद्धाराम चाकोते, विजयकुमार बिराजदार, सिद्धाराम व्हनमाने, महादेव पाटील भंडारकवठे, प्रा. अशोक निंबर्गी, सतीश पाटील वडकबाळकर, सूर्यकांत पाटील, विद्याधर मुलगे, नारोने सर, शरणराज काडादी, बाळासाहेब बिराजदार, लोकप्पा माशाळे, विठ्ठल पाटील, रावसाहेब व्हनमाने यासह अनेक नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीनंतर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जाईजुई फार्म हाऊसवर जाऊन शिंदे यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे यांचीही भेट घेतली. काडादी हे काँग्रेसकडून दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे शिष्टमंडळाने त्यांना सांगितले. काडादी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलीच तर काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, २०१९ चे उमेदवार बाबा मिस्त्री, एम के फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनवरे, शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता आहे.