मुंबई: अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षा ताफ्यात एका दुचाकीस्वार तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता सलमान खान याचे वडील आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, अशी धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेता सलमान खान हा मंगळवारी रात्री त्याच्या कारने मेहबूब स्टुडिओ येथून वांद्रे येथील घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने त्याच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. सलमान खानच्या सुरक्षेसाठी असलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला बाजूला केले; पण काही अंतर गेल्यानंतर तो दुचाकीस्वार पुन्हा सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. अखेर सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन वांद्रे पोलिसांच्या हवाली केले. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून केलेल्या तपासात मूळचा हैदराबादचा रहिवासी असलेला उज्जेर मोहिरउद्दिन हा त्याच्या मुंबईत राहत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्याचे उघड झाले.
चौकशीनंतर पोलिसांनी त्याला समन्स बजावून सोडले. ही घटना ताजी असतानाच सलीम खान हे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. थकल्याने प्रोमोनाडमधील कट्ट्यावर बसले असताना बँड स्टॅण्डच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने सलीम खान यांच्याजवळ येऊन स्कूटी थांबवली. लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, असे धमकीच्या स्वरूपात बोलून त्यांनी यू टर्न करून तेथून निघून गेले. दुचाकीवर चालकाच्या मागे एक बुरखाधारी महिला बसली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.