पुणे: राज्य सरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महानगरपालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद तयार करण्यासंदर्भात नुकताच आदेश काढला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे उपनगर म्हणून वेगाने विकसित होणाऱ्या पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन व वाघोली परिसराच्या विकासासाठी नवी मुंबईप्रमाणे नव्या पुण्याची आवश्यकता आहे. पुण्यासाठी स्वतंत्र महापालिकेचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गेल्या काही वर्षांत इचलकरंजी आणि जालना अशा दोन महापालिका नव्याने स्थापन झाल्या आहेत. पुण्याच्या महापालिकेचे विभाजन करून ‘पूर्व पुणे’ किंवा ‘हडपसर हवेली’ अशी नवी महानगरपालिका स्थापन करण्याची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यतरी या संदर्भात आपली भूमिका मांडली होती. फुरसुंगी व उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निर्णयामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. लोकसंख्येचा वाढता ताण ही पुणे महापालिकेसाठी भविष्यातील मोठी समस्या होऊ शकते. येत्या काळात हडपसर- हवेली ही स्वतंत्र महापालिका निर्माण करण्याची गरज आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे पुणे महापालिकेच्या यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने नागरिकांना किमान प्राथमिक सुविधा पुरविण्यासही यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून एकही महापालिका अस्तित्वात नसल्याने सर्व कारभार राज्य सरकारच्या हाती आहे. पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हडपसर-हवेली अशी नवी महापालिका स्थापन करावी, अशी भूमिका मांडून राज्य सरकारने या संदर्भात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडल्याने नवीन महापालिकेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुण्याच्या विकासामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पवार यांनी या भागासाठी स्वतंत्र महापालिकेची गरज अधोरेखित करून सदर विषयाला वाचा फोडली आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांसाठी नगर परिषद करण्याऐवजी पुण्याच्या पूर्वेकडील आणखी गावांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची आवश्यकता एका बैठकीत मांडण्यात आली होती. मात्र, तरीदेखील हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याच्या वाढत्या विस्तारामुळे नागरी सुविधांवर आणि ती राबवणाऱ्या सर्व यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. पूर्व पुण्याच्या विकासासाठी वेगळी महापालिका हवी अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
पुण्याचा वाढता विस्तार पाहता नवी मुंबईप्रमाणे नव्या पुण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत इचलकरंजी आणि जालना अशा दोन महापालिका नव्याने स्थापन झाल्या आहेत. पुणे महापालिकेचे विभाजन करून ‘पूर्व पुणे’ किंवा ‘हडपसर’ अशी नवी महापालिका स्थापन करण्याची हीच योग्य वेळ आहे. पुणे महापालिकेची हद्द वाढत असल्याने प्रशासनावर ताण येत आहे. हडपसर तसेच समाविष्ट नवीन गावांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. हडपसरसह या गावांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे.
लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोली परिसरातील नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या भागातील लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तातडीने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. हवेली तालुक्याच्या पुर्व भागात हडपसर महानगरपालिका करावी, असा एक मतप्रवाह आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीनही ग्रामपंचायतींच्या हद्दीत नगरपालिका किंवा नगर परिषद करावी, अशी मागणी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी यापूर्वी केली होती. या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीकडे विकासकामांसाठी निधीचा तुटवडा असतो. महानगरपालिका तयार झाल्यास विकासकामांसाठी जास्त निधी उपलब्ध होईल. त्यामुळे रस्ते, क्रीडांगण, पाणी पुरवठा, मल निस्सारण आदी गोष्टींवर खर्च करून एक सुनियोजित शहर वसवता येईल.
सध्या या भागात वाढलेल्या लोकसंखेला पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आदी मूलभूत गरजा पुरवताना ग्रामपंचायतींची दमछाक होत आहे. अपवाद वगळता बहुतेक सर्वच ग्रामपंचायतींकडे निधीची कमतरता असते. त्यामुळे इच्छा असूनही पैशांअभावी ग्रामपंचायती नागरिकांना सोयीसुविधा देऊ शकत नाहीत. नागरिकांची घरांची मागणीही वाढली आहे. अनिर्बंध बांधकामे होण्याअगोदर महानगरपालिकेचा निर्णय झाल्यास सुनियोजित शहर वसवण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.