नवी दिल्ली: भारतात यावर्षी (१३ सप्टेंबरपर्यंत) दीर्घकालीन सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजीपाला आणि दुधाच्या सरासरी किरकोळ किमतीत घट होऊ शकते, अशी माहिती सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात देण्यात आली.
पेरणी केव्हाच आटोपली असून, आता लक्ष कापणीच्या हंगामाकडे वळले आहे, असे एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालात म्हटले आहे. यावर्षी ६ सप्टेंबरपर्यंत एकूण १०९.२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत वार्षिक दोन २ टक्के वाढ नोंदवली गेली. या हंगामात सर्वच मुख्य पिकांची चांगली पेरणी झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
४१ दशलक्ष हेक्टरवर साळ, १२.६ दशलक्ष हेक्टरवर कडधान्ये, १८.९ दशलक्ष हेक्टरवर भरड धान्य आणि १९.२ दशलक्ष हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाली आहे. एकूण पेरणी क्षेत्र सामान्य पेरणी क्षेत्राच्या ९९ टक्के आहे, २०२३ मध्ये हा आकडा ९८ टक्के होता.
अतिरिक्त पुरवठ्यामुळे कृषी उत्पादनाच्या किमतीत अलीकडे घसरण पाहावयास मिळाली. नवीन माल बाजारात येईपर्यंत किमती काही काळ स्थिर राहू शकतात, असे अहवालात म्हटले आहे. बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ आदिती गुप्ता यांनी सांगितले की, देशातील बहुतांश भागांत सामान्य किंवा सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्रात २.२ टक्के वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत एकूण ८१७.९ मिमी पाऊस झाला आहे, गेल्या वर्षी हा आकडा ६८४.६ मिमी होता.