भोर : नैसर्गिक प्रवाहामध्ये शेण मिश्रित पाणी मिसळल्यामुळे वेळू येथील जुने जाई, वाडकरवाडी या वस्त्यांमधील नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत तसेच बोरवेल व विहिरीमधील पाणी प्रदूषित झाले असून यामुळे सुमारे ५०० ते ६०० नागरिकांच्या आरोग्यासोबत पिण्याच्या पाण्याचा व डासांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक साथीच्या आजारांना बळी पडत आहेत.
दूषित पाण्याच्या प्रश्नामुळे वेळूतील शेतकरी व स्थानिक नागरिक संतप्त झाले असून, या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये येत्या आठ दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
वेळोवेळी सांगूनही दखल नाही..
शिंदे मळा या परिसरामध्ये एका अग्रो नावाचा दीडशे दोनशे जनावरांचा गोठा आहे. गेली चार वर्षांपासून या गोठ्यातील शेण मिश्रित पाणी व इतर सांडपाणी हे त्या भागातून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये येउं मिळत असल्यामुळे प्रदूषित झाला आहे. त्यामुळे तेथून खाली वस्ती असणाऱ्या नागरिकांच्या विहिरी व बोरवेललाही शेण मिश्रित पाण्याचा वास यायला लागला आहे. या प्रकरणी संबंधित गोठा मालकाला वेळोवेळी याबाबतची माहिती देऊन सुद्धा संबंधित गोठा मालक कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांचा आंदोलनाचा इशारा..
स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हे पाणी खालील बंधाऱ्यांमध्ये साचल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यामुळे येथील प्रत्येक घरांमध्ये डेंगू, चिकनगुण्याचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी यावेळी देली. त्यामुळे ताबडतोब वरील गोठा मालकाला समज देऊन आपल्या सांडपाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
पंचक्रोशीतील स्वच्छ व सुंदर असा नैसर्गिक ओढा म्हणून या परिसरातील ओढ्याची ओळख आहे. परंतु, गेल्या चार वर्षांपासून फुलचंद चाटे यांनी यश अग्रो नावाने शिंदेमळा या ठिकाणी चालू केल्यामुळे ओढ्यामध्ये शेण व गोमूत्र सोडले जात आहे. त्यामुळे या ओढा प्रदूषित झाला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने व प्रशासनाने याची व्यवस्था तात्काळ करावी अन्यथा स्थानिक नागरिक म्हणून आम्ही सर्व ग्रामपंचायत समोर आंदोलनास बसणार आहोत.
शिवाजी वाडकर स्थानिक शेतकरी
सदर जागेची आम्ही पाहणी केली असून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्यामध्ये सोडण्यात आलेले मलमूत्र हे मागील वर्षीचे असून यावेळी कोणतेही मलमूत्र सोडण्यात आले नाही.
सुरेश पांगारे, सरपंच, वेळू