शिक्रापूर (पुणे): वाडेगाव (ता. शिरूर) येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा आई-वडिलांनी बालविवाह केल्याची घटना समोर आली असल्याने युवतीसह युवकाच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वाडेगाव (ता. शिरुर) येथील दत्ता गव्हाणे याच्या आई-वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने दत्ता याचा विवाह जमवला. मात्र, युवती अल्पवयीन व सोळा वर्षाची आहे हे माहीत असतानादेखील युवतीच्या इच्छेविरुद्ध तिचा वाडेगावमध्ये बालविवाह केला. विवाहानंतर सासरची मंडळी तिला शिवीगाळ, दमदाटी करत त्रासदेखील देऊ लागले.
त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी युवतीचा पती दत्ता माधव गव्हाणे, सासरे माधव सुंदरराव गव्हाणे, सासू कौसाबाई सुंदरराव गव्हाणे, सुनिता साहेबराव गव्हाणे, साहेबराव सुंदरराव गव्हाणे (सर्व सध्या रा. वाडेगाव ता. शिरुर), तसेच युवतीचे वडील भाऊराव दादाराव मोरे, आई सुमन भाऊराव मोरे, भाऊ दत्ता भाऊराव मोरे (सर्व रा. कमलापूर ता. कमलापूर जि. परभणी) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करीत आहेत.