-योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील करडे येथील प्राईमकोल्ड स्टोरेज प्रा. लि. कंपनीमध्ये ट्रॅक्टर व हायवा गाडी कंपनीमध्ये न लावल्याचा राग मनात धरून, चार जणांनी कंपनीचे मॅनेजर श्रीकांत शिवाचरण साहू याला काठी व हॉकी स्टिकने जबर मारहाण केली आहे.
याप्रकरणी 1) अमोल विलास देशमुख, 2) प्रणव राजेंद्र जगदाळे, 3) अमोल नितीन देवरे व इतर अनोळखी 1 इसम या चार जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 17 सप्टेंबर) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मॅनेजर श्रीकांत शिवाचरण साहू व त्यांचे कंपनीतील तुषार संकपाळ हा सिक्युरीटी त्याचे मोटारसायकलवर करडे ( ता. शिरुर ) गावच्या हद्दीत ते राहत असलेल्या रूमवर सोडवण्यास आला व तो रूमशेजारी सोडुन माघारी गेला. श्रीकांत शिवाचरण साहू रूममध्ये जात असताना एक ग्रे. कलरची स्वीप्ट कार नं. एम. एच. 14 एफ. जी. 0078 ही श्रीकांत साहू यांच्या समोर येऊन थांबली. त्यातून अमोल देशमुख, प्रणव जगदाळे व अमोल देवरे (रा. करडे ) हे तिघेजण गाडीतून उतरले व मोटारसायकलवर एक जण अनोळखी व्यक्ती आला.
त्यातील अमोल देशमुख हा श्रीकांत साहूला म्हणाला की, तु माझा ट्रॅक्टर व हायवा गाडी कंपनीला का लावली नाही? असे म्हणुन हाताने श्रीकांत साहू यांच्या तोंडावर मारले. त्यावेळी त्यांच्यासोबत आलेले प्रणव जगदाळे व अमोल देवरे यांनी गाडीतून हाँकी स्टीक व लाकडी काठी काढली. त्यातील एक काठी अमोल देशमुख यास दिली व त्या काठीने व हॉकी स्टीकने त्यांनी श्रीकांत साहू यास मारण्यास सुरूवात केली. त्यांनी श्रीकांत साहू याच्या पाठीवर व पायावर लाकडी काठीने व हाँकी स्टीकने मारहाण केली. मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी माणसाने श्रीकांत साहू यास पाठीमागुन धरले होते. ते मारहाण करत असताना श्रीकांत साहू मोठ्याने ओरडले असता त्यावेळी त्यांची पत्नी श्रद्धांजली ही खाली आली व मोठ्याने ओरडली.
त्यावेळी ते चार जण तेथून निघून गेले. श्रीकांत साहू यांना मारहाण झाल्याने त्यांनी 112 या नंबरवर फोन केला. तेथे पोलीस आले व उपचाराकरीता न्हावरा ग्रामीण रूग्णालय येथे घेवुन गेले. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके हे अधिक तपास करत आहे.