पुणे : राज्यात गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता गणरायाच्या विसर्जनानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्याना मुसळधार पावसाचा फटका बसणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि छत्तीसगडच्या भागात सक्रीय झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात शनिवारपासून पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस पडणार असून तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाडा भागात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. 20) सप्टेंबर रोजी जळगाव जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर शनिवारी (दि.21) सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी (दि.22) संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण, मध्य, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भासह बाकीच्या भागातही पाऊस बरसेल. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.