मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्माने T20 विश्वचषक 2024 च्या ऐतिहासिक विजयानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहितचाही हा आवडता फॉरमॅट आहे. अशा स्थितीत भारतीय कर्णधार आगामी काळात आपल्या निर्णयावरून यू-टर्न घेऊ शकतो का, यावर त्याने मोठे विधान केले आहे.
निवृत्तीबाबत रोहितचे मोठे वक्तव्य
रोहित शर्माने T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना जिंकताच या फॉरमॅटला अलविदा केला होता. रोहित व्यतिरिक्त विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता निवृत्तीतून यू-टर्न घेणार का याविषयी बोलताना रोहित म्हणाला, ‘आजकाल जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्ती हा विनोद बनला आहे. खेळाडू निवृत्तीची घोषणा करतात आणि मग पुन्हा क्रिकेट खेळायला येतात. भारतात असे घडलेले नाही, भारतात हे क्वचितच पाहायला मिळते. मी इतर देशांतील खेळाडू पाहत आलो आहे. ते आधी निवृत्तीची घोषणा करतात आणि नंतर यू-टर्न घेतात. त्यामुळे खेळाडू निवृत्त झाला की नाही, हे समजत नाही. पण माझा निर्णय अंतिम आणि अगदी स्पष्ट आहे. ज्या फॉरमॅटमध्ये मला खेळायला खूप आवडते, त्या फॉरमॅटला निरोप देण्याची हीच योग्य वेळ होती.
रोहित शर्माने टीम इंडियासाठी जवळपास 17 वर्षे टी-20 क्रिकेट खेळले. या काळात, तो दोनवेळा T20 विश्वचषक विजेत्या संघांचा भाग होता. 2007 मध्ये, त्याने एक खेळाडू म्हणून T20 विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर 2024 मध्ये, तो कर्णधार म्हणून ही ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला. या काळात रोहितने टीम इंडियासाठी एकूण 159 टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 5 शतकांच्या मदतीने 4231 धावा केल्या. त्याचबरोबर या फॉरमॅटमध्ये रोहितच्या नावावर 32 अर्धशतके आहेत.
सलग तिसऱ्या WTC फायनलवर नजर
आता रोहित शर्मासमोर सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचे मोठे आव्हान आहे. टीम इंडिया सध्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्ध खेळवली जाणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका त्याच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका टीम इंडियाची 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील शेवटची मालिका असेल. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.