देगलूर (नांदेड) : मिस्त्री काम करण्यासाठी घरी येऊन राहिलेल्या चुलत मावशीच्या मुलाने ठार मारण्याची धमकी देत अनेकवेळा अत्याचार केल्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. रविवारी (दि. १५) दवाखान्यात जाताना तिचा गर्भपात झाला असून आरोपीविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देगलूर शहराच्या देगाव नाका परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाचा नातेवाईक नईम कुरेशी (२५, रा. माळटेकडी, नांदेड) हा मागील वर्षी मिस्त्री काम करण्यासाठी देगलूर येथे आला. देगलूर येथील याच कुटुंबात राहू लागला. हळूहळू त्याचा पंधरा वर्षांच्या नातेवाईक मुलीसोबत परिचय वाढला. यातूनच २३ सप्टेंबर २०२३ रोजीच्या रात्री त्याने त्या मुलीसोबत तिच्या घरीच अत्याचार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत त्याने मागील वर्षभरात अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केला. १५ सप्टेंबर रोजी सदर अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे पितृछत्र हरवलेली मुलगी आई सोबत दवाखान्यात जात असताना रस्त्यातच तिचा गर्भपात झाला. गर्भातून बाहेर आलेले मूल घेऊन आई व मुलगी दवाखान्यात गेले असता डॉक्टराने मूल मृत झाल्याचे सांगितले.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
या अघटीत प्रकाराने संतप्त झालेल्या आईने देगलूर पोलीस ठाणे गाठून नातेवाईक नईम कुरेशी याच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून देगलूर पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी पीडितांची भेट घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड करीत आहेत. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधात पथक रवाना करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.