येरवडा : प्रियकराच्या प्रेयसीने दुसऱ्या तरूणाबरोबर प्रेमविवाह केल्याच्या रागातून प्रेयसीच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कळस येथे मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गौरी लगेश आरे (वय-२५, रा. कळस, मूळ रा. बीड) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या प्रियसीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल कांबळे याच्या बरोबर गौरीचे गेली आठ ते दहा वर्ष प्रेमसंबंध होते. दरम्यान गौरीचे लगेश याच्यावर देखील प्रेम होते. अमोलला धोका देऊन, गौरी व लगेश यांनी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. याचाच राग अमोलच्या मनात होता. गेली कित्येक वर्षे तो त्यांच्या मागावर होता. त्याला गौरीला मारून टाकण्याची संधी मिळत नव्हती.दोन महिन्यापूर्वी गौरी व लगेश आळंदी मार्गावरील कळस येथील परिसरात राहण्यास आले होते. याची माहिती अमोल याला मिळताच तो पुण्यात आला होता. मंगळवारी रात्रीच्या वेळी गणपती विसर्जनाची धामधूम सुरू होती.
दरम्यान, त्यावेळी गौरी काही वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली असता, याच संधीचा फायदा घेत अमोल गौरीच्या पाठीमागून येऊन तिच्या डोक्यात धारदार कोयत्याने दोन वार केले. गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली. विश्रांतवाडी येथील पोलीस गणेश विसर्जनात होते. घटना घडल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी केली होती. गणेश विसर्जनामुळे पोलीस आणि रूग्णवाहिका येण्यास विलंब झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या गौरीला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारदरम्यान गौरीचा बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर अमोल कांबळे एका इमारतीमध्ये लपून बसला होता. पोलीसांनी कांबळेला शोधून काढत अटक केल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.