येरवडा : पुण्यातील येरवडा परिसरात गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी येण्यास नकार दिल्याने मित्राने मित्राच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले. तसेच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या डोक्यात टोळक्याने कोयत्याने वार करून महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत आकाश आनंद कुसाळे (वय-२३, रा. वडार वस्ती, येरवडा) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सिद्धांत विष्णू गुंजाळ (वय २३), आशिष मनोहर धोत्रे (वय ३०), राहुल माळगांवकर (वय २८), कपिल धोत्रे (वय ३४), रोहन मिलिंद कुसाळकर (वय ३०), रोहित किसन शिंदे (वय२३), मयूर विष्णू गुंजाळ (वय २३) आणि सागर रमेश मोहिते (वय३२, सर्व रा. वडार वस्ती,bयेरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील गणेशोत्सव मंडळांची सोमवारी रात्री विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आरोपी सिद्धांत गुंजाळ हा आकाश कुसाळे याच्या घरी आला. आशिष धोत्रे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चल. मात्र, मी थकलो आहे, मला नको असे उत्तर कुसाळे याने दिले.
याचाच राग आल्याने गुंजाळ याने लोखंडी हत्याराने कुसाळे याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. कुसाळे याच्या डोक्यातून रक्त स्त्राव होवू लागल्याने शेजारी राहणारे नीलम शेलार आणि त्यांचा मुलगा रोहन भांडणे हे दोघे भांडणे सोडविण्यासाठी आले. त्यामुळे आरोपी गुंजाळ याने रोहन शेलार याच्याही डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
त्यानंतर आरोपींने दोन्ही जखमी तरुणांना आणि नीलम शेलार या महिलेला बेदम मारहाण करून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.