नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील किरकोळ वादातून एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव परिसरात 17 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. अफजल पठान असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अफजल पठान हा नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. अफजल पठाण यांचे त्यांच्या पत्नी नाजीम बेगम यांच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. यावेळी रागाच्या भरात पठाण यांनी त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडल्या.
यामध्ये नाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अफजल पठाण हे स्वतः ग्रामीण ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.