-बापू मुळीक
पुणे : पर्यावरण संवर्धनामध्ये सातत्याने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरंदरच्या डॉ. रमेश इंगळे यांची दखल थेट फ्रान्स च्या द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने घेऊन त्यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गेली 20 वर्ष पर्यावरणाचा एकच ध्यास घेत एकजुटीने व तळमळीने रीड्यूस, रिसायकल आणि रियुज यांचा परिपूर्ण अभ्यास करून तो ग्रामीण भागातील सामान्य जनतेमध्ये त्याचे जनजागरण केले. तसेच प्लास्टिक विरोधी अभियान, जलसंवर्धन, वृक्षारोपण व दैनंदिन जीवनात अन्न सामुग्री खरेदी बद्दल त्यांनी विशेष प्रशिक्षण बहाल केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सीइडी दिल्ली या निती आयोग नोंदणीकृत संस्थेने आणि आत्मनिर्भर भारत अभियान यांच्या संयुक्तविद्यमानाने केले होते. त्यांच्या पुरस्काराने सासवडकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
या वेळी उत्तर प्रदेश आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री दया शंकर दयाळू, विद्यापीठाचे अध्यक्ष प्रियदर्शि नायक, निसा एशियन अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन चे संचालक संदीप मारवा आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. तसेच समाजसेवेतील उत्कृष्ट योगदानामुळे रमेश इंगळे यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या या गौरवाबद्दल पुरंदर आणि हवेली तालुक्यामध्ये डॉ. इंगळे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
माझ्या कामाची दखल घेत मला एवढा मोठा पुरस्कार दिल्यामुळे मी भारावून गेलो आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. मी आणखीन चांगल्या प्रकारे पर्यावरण या विषयामध्ये काम करेल, असा विश्वास डॉ.इंगळे यांनी दिला.