Sports : १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. परंतु, या मालिकेपूर्वीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशवर निशाणा साधला आहे. नुकतेच बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोने एक विधान केले होते की, टीम इंडियाला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ताकद त्याच्यात आहे, आता यावर आता रोहितने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. रोहित शर्माने चेन्नईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रत्येकाला भारताला हरवायचे आहे आणि मालिकेपूर्वी अशाप्रकारे बोलतात.
नेमकं काय बोलला रोहित?
रोहित शर्मा म्हणाला की, ‘सर्व संघ टीम इंडियाला हरवण्याचा आनंद घेतात. त्यांना आनंद घेऊ द्या. इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांनी प्रेसमध्येही बरेच काही सांगितले. पण आमचे लक्ष त्यांच्याकडे नसते. आम्ही चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो.’ टीम इंडियाने इंग्लंडला ४-१ ने पराभूत केले होते आणि आता रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धही मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
रोहितने सांगितली ही गोष्ट..
रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले की, तो बांगलादेशविरुद्धच्या मालिकेकडे ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची तालीम म्हणून पाहत नाही. रोहित म्हणाला की, प्रत्येक मालिका, प्रत्येक सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध कधीही कसोटी मालिका गमावलेली नसून भारताने 13 पैकी 11 कसोटीत बांगलादेशचा पराभव केला आहे. मात्र, बांगलादेशचे मनोबल उंचावले आहे कारण पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर प्रवेश करून त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले आहे. बांगलादेशने अलीकडेच कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला आहे.