दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची एकमुखाने निवड झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. यामध्ये आता आतिशी यांचं नाव निश्चित झालं आहे.
आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी सहमती दर्शवली. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी दिवंगत सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे. आप नेत्या आणि मंत्री आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
आतिशी कोण आहेत?
आतिशी आम आदमी पक्षाच्या (AAP) ज्येष्ठ नेत्या आहेत. कालकाजी मतदारसंघातून त्या दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या आहेत. त्या आधी दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि नंतर २०२० च्या निवडणुका जिंकल्यानंतर आमदार झाल्या. आतिशी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास या विषयात पदवी घेतली असून नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाची शेवनिंग स्कॉलरशिप मिळवून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा त्यांच्या शैक्षणिक सुधारणांच्या कार्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे.