Ghaat Movie : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये छत्रपाल निनावे यांचा ‘घात’ या मराठी चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला. हा मराठी सिनेमा आता महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला आहे. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो.
शिलादित्य बोरा यांची ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमाची स्टारकास्टही अगदी तगडी आहे. मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांनी सिनेमात काम केलेलं आहे. या सिनेमाची सिनेमेटोग्राफी उदित खुराणा यांनी केली आहे
“घात हा एक खोल आशय असलेला सिनेमा आहे. विश्वास आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा विश्वासघात दोन्हीचं चित्रण करणारा ‘घात’ महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडला आहे. जिथे कायद्याचं राज्य तर आहे, पण अंमल नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद, धोकादायक दडलेलं असू शकतं, तशी भीती असते. तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला आहे. तिथल्या आयुष्यातली नैतिक-अनैतिकता निराळी आहे. त्यांच्या दुविधा निराळ्या आहेत, त्यातून आकार घेणारं जगणं निराळं आहे. त्यामुळेच अनेक भावभावनांचं मिश्रण असलेली ही कथा भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना मी विशेष उत्सुक आहे, असं लेखक-दिग्दर्शक छत्रपाल निनावे म्हणाले.
‘घात’ या 124-मिनिटांच्या क्राईम थ्रिलरची निवड भारतातील फिल्म बाजार येथील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी करण्यात आली होती. जिथे सिनेमाने लॅब अवॉर्ड मिळवलं. तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील GWFF बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर Jio MAMI 2023 आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) झाला.
‘घात’ सिनेमाच्या टीमने थेट ऑस्करचं स्वप्न पाहिलं आहे. आणि भारतातून ऑस्करला जाणाऱ्या अधिकृत सिनेएंट्रीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. २७ सप्टेंबर २०२४ ला सिनेमा संपू्र्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. त्यानंतरच्या आठवड्यात भारतातील महानगरे आणि प्रमुख शहरांत तसेच नॉर्थ अमेरिकेतील थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल. ‘घात’शी जोडली गेलेली नावं अत्यंत प्रतिष्ठित आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर, हे प्रतिष्ठित बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे माजी विद्यार्थी आहेत.