लोणी काळभोर : मित्राच्या गुप्तांगावर वार करून खुन झाल्याची धक्कादायक घटना शेवाळवाडी बसथांब्याजवळ मंगळवारी (ता.१५) रात्रीच्या सुमारास घडली होती. सदर खून हा पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याचे गूढ पोलिसांना उघडण्यात यश आले. खून करून फरार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी दिल्ली येथून बेड्या ठोकल्या.
पिताराम केवट (वय २३, रा. शेवाळवाडी बसथांबाशेजारी मांजरी, मूळ. मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. शेवाळवाडी बसथांब्याशेजारी, मांजरी, मूळ रा. कर्नाटक) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण अरुण सूर्यवंशी (वय २५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिताराम आणि अरुण सूर्यवंशी हे शेजारी शेजारी राहत होते. आणि दोघेही एकाच नर्सरीत कामाला होते. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर ते दोघे दारू पिण्यासाठी गेले. त्यानंतर आरोपी पिताराम हा एकटाच घरी परतला.
त्यामुळे अरुण यांच्या कुटुंबीयांनी पिताराम याच्याकडे चौकशी केली असता आरोपी पिताराम याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. त्याच रात्री आरोपी पिताराम हा घरातील सर्व सामान व पत्नीला घेऊन पसार झाला.
त्यानंतर अरुण सूर्यवंशी यांचा मृतदेह आढळून आला. याची लक्ष्मण सूर्यवंशी यांनी तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी पिताराम केवट याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल केलेला संशयित आरोपी कुटुंबासह परराज्यात फरार पसार झाला. मात्र, हडपसर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करताना आरोपीचा मागे काढत मध्यप्रदेश मार्गे दिल्लीपर्यंत पोचले व आरोपीला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यावर अधिक तपास केला असता, पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून केला असल्याची पोलिसांना कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास निरीक्षक विश्वास डगळे करीत आहेत.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सहाय्यक फौजदार सुशील लोणकर, पोलीस नाईक संदीप राठोड समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ व निखिल पवार यांच्या पथकाने केली आहे.