पुणे : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रेल्वे अपघात घडून आणण्यासाठी ट्रॅकवर गॅस सिलिंडर, पेट्रोलने भरलेली बाटली आणि एका पिशवीत ज्वलनशील पदार्थ ठेवल्याचे आढळून आले होते. तसेच गेल्या आठवड्यात सोलापूर विभागातील कुर्डुवाडी स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर सुमारे २३० किलोचे ‘स्लीपर’ ठेवल्याचे आढळून आले होते.
पुणे: विभागातील रेल्वे ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून दगड, सिमेंटचे गट्टू ठेवून घातपात घडवण्याचे कट रचले जात आहे. यापार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेकडून रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षितेसाठी संशयित ठिकाणी रेल्वे प्रशासनाला सीसीटीव्ही बसविण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ट्रॅकवर २० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे.
रेल्वे सुरक्षा बलाची नुकतीच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसोबतच्या बैठकीमध्ये गुप्तचर यंत्रणेने रेल्वे प्रशासनाला पुणे विभागातील काही संशयित ठिकाणांची माहिती दिली. तसेच तेथे घातपाताची शक्यतादेखील वर्तवली आहे. त्यामुळे या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे.